Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
डॉग व्हॅनची शहरातून केवळ नौटंकीच, मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम थंडच

26-Sep-2017 : सांगली / प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्री पकडण्यासाठी मनपाच्या दोन डॉगव्हॅन आहेत. मात्र या डॉगव्हॅन शहरातील केवळ नौटंकी करत फिरतात. भटकी कुत्री अथवा डुकरे पडकली जात नाहीत. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या 25 हजारावर गेली असून नागरिकांवर हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सोमवारी मिरज शहरात मोकाट कुत्र्यांनी पाचजणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यापूर्वी मिरज येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी 17 जणांवर हल्ला केला. मोकाट कुत्र्यांनी सांगली व मिरज शहरात धुमाकूळ घातला असताना महापालिकेची आरोग्य यंत्रणा सुस्त बसल्याचे दिसत आहे. मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या बालक व वृध्दांवर हल्ले करतात. महापालिका क्षेत्रातील अशा अनेक घटनादेखील घडल्या आहेत. त्यामध्ये बालकांना जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील मनपाच्या आरोग्य यंत्रणेला जाग येत नाही. मोकाट कुत्र्यांनी एप्रिल 2010 मध्ये बेडग येथील चिन्मयी उमेश कारंडे या दोन वर्षाच्या बालकावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कुटुंबियांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. राज्य मानवी हक्क आयोगाने कारंडे कुटुंबियांना नुकसान भरपाईपोटी पंधरा लाख रूपये देण्याचे आदेश नगरविकास खात्याला दिले आहेत.

कत्तलखान्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली असल्याने महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढत मनपावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तरीदेखील मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना जाग आली नाही. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर आरोग्य विभाग जागा होतो. मग हल्ले रोखण्यासाठी आठवडाभर डॉगव्हॅनचा शहरात शो केला जातो.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter