Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
आजच्या महासभेत अटी-शर्तींसह घनकचरा प्रकल्प मंजूर होणार

26-Sep-2017 : सांगली / प्रतिनिधी

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या डीपीआरला मान्यता देताना चर्चेने अटी-शर्ती घातल्या जाणार आहेत. त्यामुळे बुधवारच्या महासभेत घनकचरा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, जकातीच्या जागा भाड्याने देण्याचा विषय रद्द करून सर्व जागांचे फेरमुल्यांकन करून जाहीर निविदा काढण्याचा विषय महासभेत येणार आहे.

महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महासभा होणार आहे. ही महासभा बेकायदेशीर असल्याचा दावा उपमहापौर गटाने केला आहे. या सभेला आयुक्तांनी उपस्थित राहू नये असे आवाहन त्यांनी केले होते. शिवाय महापालिकेच्या कायदेशीर सल्लागारांनी शासनाचे मत घ्यावे, असा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे ही सभा कायदेशीर की बेकायदेशीर यावरून चांगलाच वाद रंगणार आहे. नगरसचिव कल्लाप्पाण्णा हळींगळे यांनी महासभा कायदेशीर असल्याचा खुलासा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पार्टी मिटिंगमध्ये केला आहे. यामुळे महासभा कायदेशीर होणार आहे.

महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पाच्या डीपीआरला मंजुरी देण्याचा विषय महासभेत आला आहे. यापुर्वी दोन वेळा हा आराखडा स्थगित ठेवण्यात आला आहे. आता पुन्हा तो मुळ आराखडाच सभेत आणण्यात आल्याने यालाही उपमहापौैर गटाने विरोध केला आहे. मात्र महापौर गटाने हा आराखडा मंजुर करणार असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पीपीपी शब्द काढला तर प्रकल्पाला मान्यता देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तर कॉंग्रेसने या डीपीआरमध्ये अटी-शर्ती घालण्यात येणार आहेत. यानंतर डीपीआरला मान्यता देण्याचा निर्णय नगरसेवकांनी बैठकीत घेतला आहे. यामुळे घनकचरा प्रकल्पावर महासभेत शिक्कामोतर्ब होणार आहे.

तसेच कोल्हापूर रोड, सांगलीवाडी, माधवनगररोडवरील जकात नाके भाड्याने देण्याचा विषय सभेत आला आहे. याला कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे. केवळ बांधलेल्या खोक्याचे मूल्यांकन केले गेले आहे. जागेचे मूल्यांकन केले नाही. त्यामुळे हा विषय रद्द करून जागा व खोक्यांचे फेरमूल्यांकन करून जाहीर निविदाव्दारे जागा भाड्याने देण्याचा निर्णय महासभेत घेण्यात येणार आहे. माळबंगला येथील वादग्रस्त जागेच्या शासकीय मोजणीचा अहवाल सादर करण्याची मागणी कॉंग्रेसचे स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील व राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार हा अहवाल महासभेत सादर होणार आहे. या विषयावरूनही सभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter