Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत पेट्रोलपंपावर जिल्हाधिकाऱ्यांचा छापा
News Image

26-Sep-2017 : सांगली/प्रतिनिधी

सांगली-माधवनगर रोडवर बायपासनजीक असणाऱ्या भारत पेट्रेालियम कंपनीच्या मातोश्री पेट्रोल पंपावर जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी मंगळवारी सकाळी अचानक छापा टाकला. या पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले. पेट्रोलची घनता व साठा यामध्ये तफावत असल्याचे तसेच पेट्रोल साठ्याचे रजिष्टर अद्यावत नसल्याचे समोर आले आहे. जीवनाश्यक वस्तू नियंत्रण कायद्याअंतर्गत संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस विभागास दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी दिली. या कारवाईने जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांच्यात खळबळ उडाली आहे.

पेट्रोलपंपावर भेसळ होत असल्याची निनावी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे आली होती. या माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी काळम-पाटील यांची गाडी काल सकाळी आठ वाजताच बाहेर पडली. काळम यांनी थेट बायपासरोडवरील पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, आर.टी. ओ. दशरथ वाघोले यांच्यासह पुरवठा विभाग तसेच पोलीस खात्याचा फौजफाटा घेऊनच ही कारवाई केली. पेट्रोलपंप गाठला. मिळालेल्या माहितीतील पंप आहे का, याची खात्री करून घेतली. त्यानंतर कामगारांकडे अधिक चौकशी केली. सोबत निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी होते. तपासणीस सुरुवात केली. तोपर्यंत जिल्हा पोलीस अधिक्षक शिंदे हे सहकारी अधिकाऱ्यांसह दाखल झाले. जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड व वजनमापे तपासणी अधिकारी यांना बोलावून घेण्यात आले. प्राथमिक तपासणी केली असता पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांनी पेट्रोल भरण्याचे मशिन खोलून पाहिले असता मशिनरीमध्ये फेरबदल करता येऊ नये यासाठी करण्यात आलेले सील तोडल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून ही कारवाई सुरु असतानाच जिल्हा पोलीस अधिक्षक शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत बोराडे, आर. टी. ओ. दशरथ वाघुले, पोलीस उपअधिक्षक दिपाली काळे, पोलीस निरिक्षक रविंद्र डोंगरे, पोलीस निरिक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरिक्षक राजन माने, अतुल निकम, जिल्हा पुरवठा अधिकारी भानूदास गायकवाड, वैद्यमापन शास्त्र निरिक्षक आर.पी. टाळकुटे घटनास्थळी दाखल झाले. भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर व इतर अधिकाऱ्यांना तातडीने बोलावण्यात आले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter