07-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार ऑरेंज झोनमध्ये सम-विषम प्रमाणात व्यापार , उद्योग सुरु झाला. सांगली जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्यापारीपेठा सुरु झाल्या आहेत, मात्र सांगली जिल्ह्यातील राजकीय अनास्था व प्रशासकीय अनागोंदीमुळे येथील व्यापाराबाबत बोटचेपी भूमिका घेतली गेल्यामुळे अजूनही व्यापार बंदच आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस अधिक्षक यांच्या भूमिका व शासकीय आदेशांचे वेगवेगळे अर्थ लावण्याची प्रवृत्ती यामुळे व्यापार्यांना दणका बसत आहे. आता व्यापारी हतबल झाले असून सोमवारपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही तर स्वत:हून व्यापार सुरु करु, असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी दिला आहे.
शासकीय आदेशानुसार ऑरेंज झोनमध्ये प्रथम पाचपेक्षा कमी दुकाने सुरु करण्याचा आदेश होता , मात्र नंतर ही मर्यादा काढून टाकण्यात आली. लॉकडाऊनमध्ये जीवन सुसह्य व्हावे म्हणून शासनाने रेड, ऑरेंज व ग्रीन झोन केले आहेत, मात्र सांगलीत सर्वांचीच वर्तवणूक ही रेड झोनप्रमाणे राहिलेली आहे. अतिकाळजीपोटी प्रशासनाकडून लॉकडाऊनचे व बंदचे जोरदार समर्थन केले जाते. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी जितकी जबाबदारी नागरिकांची आहे तितकीच जबाबदारी अमर्याद अधिकार घेणार्या प्रशासनाचीदेखील आहे. रस्त्यावर अपघात होतात म्हणून कुणी वाहतूक बंद करण्याचे धोरण घेत नाही तशा पध्दतीने कोरोना वाढतो म्हणून व्यापारच बंद करण्याची भूमिका घेतली जात आहे. पहिले दोन लॉकडाऊन तब्बल ४० दिवसांचे होते आता तिसर्या लॉकडाऊनला सुरुवात होऊन चार दिवस उलटले तरी जनजीवन पूर्ववत करण्याऐवजी ते थांबेल कसे? यावरच जोर राहिलेला आहे. याला आता व्यापारी व सर्वसामान्य जनता कंटाळली असून त्याचा उद्रेक झाल्यानंतर प्रशासन व राजकारण्यांना जाग येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत व्यापारी असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे.
व्यापार्यांना सध्या कोणी वाली नाही. राज्य शासनाने रेड झोन वगळता इतर ठिकाणची दुकाने सुरू करण्यास मान्यता दिली असतानाही जिल्हाधिकार्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसांत बाजारपेठेतील १०० टक्के दुकाने सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नाही तर सोमवारनंतर व्यापारी स्वत:हून दुकाने उघडतील, असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी गुरुवारी दिला.
|