08-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविण्यापूर्वी जी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसारच सांगलीतील बाजारपेठ बंद आहे. जिल्हा प्रशासनाने यामध्ये स्वत:च्या कोणत्याही अधिकाराचा वापर केलेला नाही. नजीकच्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. मात्र याबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा केली आहे. रविवार (दि. १०) रोजी व्यापार्यांसोबत बैठक घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सांगलीतील उपनगरात व्यवहार सुरु असून प्रमुख बाजारपेठ मात्र अद्याप बंद आहे. जिल्हा प्रशासनाने गर्दीच्या भितीने ही बाजारपेठ उघडण्यास मनाई केलेली आहे. तर व्यापारी बांधवांनी सोमवारपासून बाजारपेठेतील दुकाने सुरु करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची भूमिका मांडण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ.चौधरी म्हणाले, दि. ३ मे रोजी लॉकडाऊन संपणार होता , मात्र त्यामध्ये शासनाने वाढ केली. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनास नियमावली पाठविण्यात आलेली होती. त्यामध्ये शहराचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन होते. त्यामध्ये स्पष्टपणे शहरी भागातील मॉल तसेच बाजारपेठ तसेच संकुल आदी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्या नियमांना अधिन राहूनच जिल्हा प्रशासनाने सांगलीतील बाजारपेठेतील दुकाने उघडण्यास बंदी घातलेली आहे. सध्या उपनगरातील दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच बाजारपेठेच्या परिसरा तील सोडून अन्यत्र असलेल्या मद्य विक्री करणार्या दुकानांनादेखील परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाने स्वत:चे कोणतेही अधिकार वापरलेले नाहीत. आपल्या शेजारच्या जिल्ह्यात प्रामुख्याने सोलापूर आणि सातारा येथे कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. परिणामी ते जिल्हे रेड झोनमध्ये गेलेले आहेत. आपला जिल्हा ऑरेज झोनमध्ये असला तरी आपण सर्वांनीच आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.
|