08-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
निगडीतील (ता. शिराळा) तेवीस वर्षीय तरुणीसह तिच्या आईचा दुसर्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे निगडीतील माय-लेक कोरोनामुक्त रुग्ण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. दोघींनाही मिरजेतील आयसोलेशन कक्षातून संस्था क्वॉरंटाईनमध्ये चौदा दिवस ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या दोघींच्या संपर्कात आलेल्या संस्था क्वॉरंटाईनमधील १४ जण तसेच कामेरी व कासेगावमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील २५ जण याशिवाय येतगावमधील चारजणांचा दुसरा कोरोनाचा अहवालही निगेटिव्ह आल्याने अशा ४३ जणांना आज (शनिवारी) डिस्चार्ज दिला जाणार आहे.
निगडीतील तरुणी आणि तिचा भाऊ कुटुंबातील एका व्यक्तीच्या उपचारासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते. तेथील रुग्णालया तील उपचारानंतर तरुणी आणि तिचा भाऊ १६ एप्रिलरोजी मुंबईतून निगडीमध्ये आले. मुंबईतून आल्यानंतर तरुणीची तब्येत बिघडली होती. तिला ताप आल्याने इस्लामपुरातील खासगी दवाखान्यात उपचार घेत होती. तरुणीत कोरोनाची लक्षणे आढळली होती, त्यामुळे तरुणीसह तिच्या भावाचे कोरोना चाचणीच्या तपासणीसाठी स्वॅबचे नमुने घेतले होते. त्या तरुणीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह तर भावाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तरुणीच्या संपर्कात आलेल्या ३८ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. तरुणीच्या आईचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. मिरजेतील कोविड रुग्णालयात तरुणीवर उपचार सुरु होते.
|