08-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
सांगली शहरातील महसूल कॉलनीमध्ये मुंबईतून बेकायदेशीरपणे आलेली एक व्यक्ती कोेरोना पॉझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. जत तालुक्यातील अंकलेमध्येही मुंबईहून आलेल्या एका चाळीसवर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोघेही मुंबईहून सांगलीत बेकायदेशीरपणे आले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबियांना व नातेवाईकांना आरोग्य पथकाने संस्था क्वॉरंटाईन केले असून त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीतील आठ कोरोना रुग्णांपैकी निगडीतील दोघी कोरोनामुक्त झाल्या होत्या , मात्र त्याचदिवशी पुन्हा दोन रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची आठ संख्या कायम राहिली. दरम्यान सांगलीतील बाधिताचे दहाजणांचे कुटुंबिय व इतर संपर्कातील आलेल्या ३४ जणांचे क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये अंकले येथील चौघेजण कामासाठी होते. चौघेजण बुधवारी चेंबूर येथून नागज फाटा येथे आले होते. तेथून हे चौघे अंकले येथे चालत गेले असल्याची माहिती मिळाली. गावातील नागरिकांना हे तरुण मुंबईतून आल्याचे समजताच या चौघांना गावकर्यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वॉरंटाईन केले होते. दरम्यान याची माहिती मिळाल्यानंतर डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित चोथे यांच्या पथकाने बुधवारी रात्री तपासणी केली. या चौघांमध्ये एकाची लक्षणे संशयास्पद आढळल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मिरजेतील कोरोना रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्या स्वॅबची तपासणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. जतमध्ये मुंबईतून मोठ्या प्रमाणावर नागरिक बेकायदेशीर येत आहेत.
|