11-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
गतवर्षी आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले होते. यंदाही अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिल्याने त्याचा सामना करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नदी काठावरील गावांना चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा पडल्याने मदत पोहोचवता आली नाही. पूरग्रस्तांना वेळेत मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विमानतळाच्या धर्तीवर हेलीपोर्ट असावे, असा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पूरस्थिती रोखण्यासाठी कोयना धरणातील पाणीसाठा कमी करुन दुष्काळी भागातील सिंचन योजनांचे तलाव भरून घेतले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकीनंतर सहकार राज्यमंत्री डॉ. कदम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची उपस्थिती होती.
राज्यमंत्री डॉ. कदम पुढे म्हणाले. येणारा पावसाळा आणि पूर परिस्थितीच्या पार्श्व भूमीवर बैठकीत आढावा घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात वाढू नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात महापुराने थैमान घातले होते. पाच ते सहा दिवसांत झपाट्याने पाणी वाढल्याने उपाययोजना करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. कृष्णा आणि वारणा काठच्या एकशे चार गावांना पुराच्या पाण्याने वेढले होते.
घरांची पडझड, शेतीचे प्रचंड नुकसान झाले , शिवाय अनेकांना प्राणही गमवावे लागले. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत मदत देण्यात अडचणी निर्माण झाल्या. पूरस्थितीत जवानांना पाचारण केले , मात्र त्यांचे हेलीकॉप्टर उतरण्यासाठीही कसरत करावी लागली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी विमानतळ नाही, तेथे विमानतळाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात हेलीपोर्ट सुरु करण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल.
|