23-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
एरंडोली-नरवाड नळपाणी योजनेचा प्रश्न गेल्या अकरा वर्षांपासून रेंगाळला आहे. एकाच लाईनमधून दोन पाईपा टाकल्या आहेत. कामही निकृष्ट असल्याबाबतचा सर्वसाधारण सभेत आरोप केला होता. याशिवाय योजनेचे कामही अपूर्ण असल्याबद्दल संबंधित ठेकेदारावर फौजदारी दाखल करण्याची मागणी जोरदार झाली, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या नातेवाईकाचा त्यामध्ये समावेश असल्याने संबंधित योजनेच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. सदस्यांच्या दबावामुळे योजनांची चौकशी सुरू झाली आहे. चौकशी अधिकारी असलेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार आक्रमक झाल्याचे अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
मिरज तालुक्यातील एरंडोली आणि नरवाड या दोन गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा योजना सन २००९ साली मंजूर झाली होती. त्या योजना स्वतंत्र असतानाही एकाच चरीतून दोन्ही पाईपलाईन केल्या आहेत. तसेच त्याची पाईप आणि मोटारी यामध्ये अनियमितता आहे. ५० एच. पी. क्षमतेचा प्रस्ताव असून २५ एच.पी. मोटारी बसविल्या आहेत. तसेच इतर पातळ्यांवरही योजना निकृष्ट केल्याने सन २००९ पासून आजपर्यंत या दोन्ही गावांना पिण्याचे पाणी मिळाले नसल्याची तक्रार, माजी बांधकाम सभापती अरुण राजमाने आणि सदस्य मनोज मंडगणूर यांनी केला होता. त्यावर पाणीपुरवठा विभागाकडून चौकशीचे आश्वासन दिले, मात्र यापूर्वी अनेकदा तक्रार करून देखील कारवाई नसल्याने आता संबंधित ठेकेदारावर फौजदारी दाखल करण्याची मागणी सर्व सदस्यांनी केली. याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचा नातेवाईक योजनमध्ये ठेकेदार असल्याने कारवाईला टाळाटाळ केली होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी एरंडोली आणि नरवाड पाणी योजना प्रकरणात कडक पावले उचलली आहेत. या दोन योजनांची चौकशी म्हणजे एकूणच पाणी पुरवठा विभागाच्या कारभाराची पोलखोल राहिल.
|