23-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजपकडून होत आहे. हे आश्चर्यकारक आहे. महापुराच्या संकटात तत्कालिन भाजप सरकारने काय काम केले? शेतकरी व पूरग्रस्तांना किती मदत केली? हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे विरोधकांनी कोरोनाच्या परिस्थितीत राजकारण आणू नये, असा टोला राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपला लगाविला. तर राज्याची अर्थव्यवस्था सुरू करून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ना. विश्वजीत कदम यांनी महापालिकेत कॉंग्रेसच्या नगरसेवकांची चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ना. कदम म्हणाले, संचारबंदी, लॉकडाऊन लागू आहे. त्यासाठी राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. तो कुठल्या पक्षासाठी, जातीधर्मासाठी नाही. त्यामुळे या काळात कुणी राजकारण करू नये, प्रदर्शन, आंदोलन करू नये.’ ते म्हणाले, विरोधकांनी मुख्यमंत्री निधीला मदत करू नये पंतप्रधान निधीला मदत करावी, असे सांगून पक्षीय राजकारण करू नये. त्यापेक्षा केंद्राकडून राज्यात जास्तीत जास्त शेतकरी व इतर घटकांना कशी मदत मिळेल, याची भूमिका पार पाडावी.
|