28-Jun-2020 : नागज फाट्यानजीक वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार
जनप्रवास प्रतिनिधी
कवठेमहांकाळ : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठे महांकाळ तालुक्यातील नागज फाट्यानजिक भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा चारचाकी वाहनाने मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार भिवाजी गणपती घेरडे (वय ५०, रा.किडेबिसरी ता.सांगोला जि.सोलापूर) हे जागीच ठार झाले.हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशीरा अपघाताची नोंद झाली आहे.
अपघाताबाबत पोलीसाकडून समजलेली माहिती अशी की, नागज गावच्या हद्दीत पश्चिम दिसेला सुमारे दीड कि.मी.अंतरावर असलेल्या इंडियन पेट्रोल पंपासमोर सांगोल्याहून मिरजेकडे जाणारी महिंद्रा चारचाकी (क्र.एम एच १३/ बी. एन.८२३८) घेऊन मरवडे ता. मंगळवेढा जि.सोलापूर येथील विजय भोसले निघाले होते. तर मिरजेहून नागजच्या दिशेने किडेबिसरी येथे मोटारसायकलवरून (क्र.एम.एच.४५/ डब्लू- ५५७४) भिवाजी घेरडे जात होते.
महिंद्रा चारचाकी वाहनाच्या चालकाने वाहन भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करून वाहनास ओव्हरटेक करताना समोरून येणार्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.या अपघातात भिवाजी घेरडे मोटरसायकलीवरून खाली पडून त्यांच्या डोकीस जबर मार लागल्याने जागीच ठार झाले. मृत भिवाजी घेरडे हे सांगली येथील युनियन बँकेत नोकरीला आहेत.
|