28-Jun-2020 : जनप्रवास प्रतिनिधी
श्र सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नसून रविवारी तब्बल १९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हॉटस्पॉट असलेल्या शिराळा तालुक्यातील तब्बल तेरा जणांचा त्यामध्ये समावेश आहे. शिराळ्यातील शिराळे खुर्द येथे नऊ जण, कोकरूडमध्ये २ तर निगडी व ढाणेवाडी येथे एक-एक रुग्ण आढळला. पलूस तालुक्यातील दुधोंडी व पुणदी, तासगाव तालुक्यातील वाघापूर, जतमधील बिळूर, वाळवा तालुक्यातील बावची येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुन्हा एक ब्रदर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ३५८ वर गेली असून सद्यस्थितीत १२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिकच वाढत चालली आहे. मुंबईहून येणार्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रविवारी नवे १९ रुग्ण आढळले. शिराळा तालुका हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्यामध्ये तब्बल १३ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मणदूर येथील रुग्णांची संख्या कमी झाली असताना शिराळे खुर्द येथे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत.
७५ व ८७ वर्षीय दोन वृद्ध, ४५ व २८ वर्षांचे पुरुष, १४ व १६ वर्षांची दोन मुले, ४५ वर्षांची महिला, ३५ व ३० वर्षांच्या दोन महिला याशिवाय एकोणीस वर्षाची एक मुलगी हे सर्वजण बाधितांच्या संपर्कात आले होते. या सर्वांच्या प्रकृतीमध्ये बिघाड जाणवू लागला होता. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी या सर्वांना चाचणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयाकडे पाठविले होते. त्यांची कोरोना चाचणी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आली होती.
|