28-Jun-2020 : जनप्रवास प्रतिनिधी
श्र सांगली : सांगली-कोल्हापूर रोडवरील गेल्या तीन महिन्यांपासून बंद असणार्या हॉटेल वैशाली येथे अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेऊन हॉटेल फोडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी हॉटेलमधील भांडी, ग्लास चमचे, जेवण बनविण्याचे साहित्य लंपास केले आहे. या चोरी प्रकरणी हॉटेलचे मॅनेजर प्रदीप काशिनाथ कांबळे (वय ३९, रा. कसबेडिग्रज) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली - कोल्हापूर मार्गावरील आकाशवाणी केंद्राजवळ हॉटेल वैशाली आहे. लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यापासूनच हे हॉटेल बंद होते. या ठिकाणी हॉटेलचा कोणताही कर्मचारी नव्हता. हॉटेलचे मालकही कधीतरी या ठिकाणी येत होते. हॉटेलला लाईट कनेक्शन नसल्याने हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरेही बंद आहेत. याचाच फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला. हॉटेल बंद असलेले पाहून चोरट्यांनी काही दिवस पाळत ठेऊन या हॉटेल मध्ये धाडसी चोरी केली. हॉटेलचे मॅनेजर प्रदीप कांबळे हे दोन दिवसांतून एकदा हॉटेलकडे येऊन पाहणी करत होते. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मॅनेजर कांबळे हे हॉटेलकडे पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना हॉटेलचा मागील दरवाजा उघडा दिसला, त्यांनी किचन मध्ये जाऊन पाहणी केली असता किचनचाही दरवाजा उघड दिसला. किचनमध्ये ठेवलेले साहित्य नव्हते. ते गोडावूनमध्ये पाहणीसाठी गेले असता गोडाऊनचा दरवाजा हा तुटलेला दिसला आणि गोडावून मध्ये ठेवलेले सर्व साहित्य गायब झालेले निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी तातडीने हॉटेल मालकांना दिली. मालकांनी तेथे येऊन पाहणी केली असता हॉटेलमध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्यांनी हॉटेलमधील ताटे, वाटी, ग्लास, डिनर प्लेट, क्वाटर प्लेट, चमचे, कुकर, खुर्च्या, मोठी पातेली, फ्राय पॅन, चाकू, स्टीलचे डबे, पिंप, हॉट बॉक्स, बाऊल यांसह सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी प्रदीप कांबळे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव हे करत आहेत.
|