28-Jun-2020 : सांगली : महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाने आठ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याच काळात कोरोनाचे संकट राज्यासह देशात आले. परिणामी पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करावी लागली. कोरोनाचे संकट संपताच तातडीने ही रखडलेली पोलीस भरती केली जाईल अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्याचसोबत जिल्ह्यातील पोलिसांच्या निवासस्थानाबाबत अनेक वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न येत्या आठ दिवसांत पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक घेऊन सोडवू अशी माहितीही त्यांनी दिली. त्याचबरोबर भाजपचे नवनिर्वाचित आ. गोपीचंद पडळकर हे जर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसतील आणि १०० गाड्यांचा ताफा घेऊन फिरत असतील तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करू असेही ते म्हणाले . जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा . महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.
गृहमंत्री अनिल देशमुख पुढे म्हणाले, पोलीस विभाग, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात अत्यंत चांगला समन्वय असून राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पोलीस यंत्रणेचे योगदान महत्वपूर्ण आहे. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पोलीस दल अहोरात्र कष्ट घेत आहे, असे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने हळूहळू उद्योगधंदे गती घेत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात स्वराज्यात व स्वगावी परत गेलेले मजूर, श्रमीक पुन्हा कामासाठी महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे स्थानीक यंत्रणांवर पुन्हा ताण वाढणार आहे. त्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन काटेकोर पध्दतीने व्हावे, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. जिल्हा बंदी उठविण्याबाबत ते म्हणाले, सध्या बाहेरून ग्रामीण भागात आलेल्यांमुळे कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. जिल्हा बंदी उठविली तर कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा बंदी उठविण्याबाबत सर्वतोपरी विचारविनिमय करून निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. नागपूर हे गेल्या पाच वर्षात क्राईम कॅपिटल म्हणून सर्वत्र चर्चिले जात होते. माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या जिल्ह्यात क्राईम वाढला असं चित्र निर्माण झालं होत. आमचं सरकार आल्यानंतर नागरपूरची क्राईम कॅपिटल ही ओळख पुसून टाकत आहोत.
ते म्हणाले, राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम रखडलेली पोलीस भरती करू अशी घोषणा केली होती. राज्यात आठ हजार पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र, त्याचवेळी राज्यासह देशात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यामुळे ही भरती प्रक्रिया कोरोनाचे संकट कमी झाल्यावर करू. कोरोनाच्या लढ्यात योगदान देताना काही पोलीस कर्मचार्यांनाही कोरोनाची लागण झाली. राज्यात पोलीस दलातील आतापर्यंत ५८ कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत पोलीस कर्मचार्यांच्या कुटुंबियांना ६५ लाखांपर्यंत मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. तसेच त्या मृत पोलीस कर्मचार्याचा सेवा निवृत्तीचा कालावधी पूर्ण होइपर्यंत त्याच्या कुटुंबियांना शासकीय निवासस्थानात राहता येणार आहे तसेच त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
|