14-Jul-2020 : जनप्रवास /प्रतिनिधी
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील पन्नास वर्षांवरील अतिजोखीम व्यक्तिंच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी मंगळवारपासून ‘होम टू होम’ सर्व्हेला सुरूवात झाली. त्यासाठी शंभर कर्मचार्यांची २० पथके तयार करण्यात आली असून वॉर्डनिहाय दहा दिवसांत सर्व्हे पूर्ण करण्यात येणार आहे. अतिजोखीम व्यक्तिंना ताप, सर्दी व खोकल्याची लक्षणे आढळली तर त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
महापालिका क्षेत्रातील पन्नास वर्षांवरील रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, मूत्रपिंड व दमा विकार असणार्या व्यक्ति हायरिस्कमध्ये आहेत. त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त आहे. वेळेत निदान न झाल्याने अनेकजणांचा बळी गेला आहे. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व घरांमध्ये जाऊन ‘होम टू होम’ सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मनपाच्या कर्मचार्यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांनी प्रशिक्षण दिले. महापालि केची प्रभागनिहाय वीस पथके तयार करण्यात आली आहेत.
प्रत्येक पथकामध्ये सनन्वयक, सहाय्यक समन्वयक, नर्स, आशा व चालक असे पाचजण असणार आहे. देखरेखीचे काम समन्वयक करणार आहे , तर सहाय्यक समन्वय नागरिकांच्या नोंदी करून घेणार आहे. नर्स व आशा वर्कर संबंधित व्यक्तिचा रक्तदाब, तापमान व श्वाच्छोेश्वासाच्या प्रमाणाची तपासणी करणार आहेत. सुमारे पन्नास हजार व्यक्तिंची तपासणी होण्याचा अंदाज आहे. मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवरून पथके रवाना झाली. यावेळी महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस, महिला व बालकल्याण सभापती नसिमा महात, आरोग्य अधिकारी डॉ.रविंद्र ताटे, विकास पाटील आदी उपस्थित होते.
या टीमच्या माध्यमातून दररोज होणार्या तपासणीची नोंद येथील मंगलधाम शॉपिंग सेंटरमधील कार्यालयात होणार आहे. पन्नास वर्षांवरील व इतर आजार असलेल्या व्यक्तिंना जर सर्दी, ताप, श्वास घेण्यास अडचण, खोकला यापैकी एक जरी त्रास असेल तर त्या नागरिकांची वॉर्डनिहाय माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर वॉर्डातील वैद्यकीय अधिकारी संबंधित रूग्णाची तपासणी करून आवश्यक वाटल्यास कोरोना चाचणी घेणार असल्याचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ.रविंद्र ताटे यांनी सांगितले.
दोनशे शिक्षक देखील करत आहेत सर्व्हे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नियोजनानुसार महापालिका क्षेत्रातील ५० वर्षांवरील नागरिकांचा सर्व्हे करण्यासाठी दोनशे शिक्षकांची नेमणूक केली आहे. ते देखील घरोघरी जाऊन नागरिकांचा सर्व्हे करत आहेत. त्याची सुरूवात झाली आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांची माहिती द्यावी असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
|