14-Jul-2020 : जनप्रवास प्रतिनिधी
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सांगलीतील आणखी दोन व्यक्तींचा मंगळवारी मृत्यू झाला. सांगली शहरातील चांदणी चौक येथील ६९ वर्षीय पुरुष आणि वडर गल्लीतील ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. जिल्ह्यात नव्याने तब्बल २३ रुग्णांची नोंद झाली असून ३६ जण कोरोनामुक्त झाले. बाधितांचा सातशेचा आकडा पार झाला. सांगली शहरात चार तर मिरजेत तीन रुग्ण आढळून आले. कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्दमध्ये सहा, हिंगणगाव व चिंचणी वांगी प्रत्येकी एक, जतमधील निगडी खुर्दमध्ये तीन, बामणोली दोन, भोसे, आगळगाव, कोकळे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. सद्यस्थितीत ३०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मागील पंधरवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढली असताना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. सांगली शहरातील चांदणी चौक येथील ६९ वर्षीय पुरुषामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्या व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले होते. त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. वडर गल्लीतील ६५ वर्षीय महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे होती. तिच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, मात्र सोमवारी त्या महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या २३ वर पोहोचली आहे. याशिवाय जिल्ह्यात नव्याने २३ रुग्ण आले.
महापालिका क्षेत्रात सात रुग्ण
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात मंगळवारी दिवसभरात सात नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सांगलीमध्ये ६५ वर्षीय वृद्ध आणि २७ वर्षांचा तरुण, ४२ वर्षीय महिला व वडर गल्लीतील ६५ वर्षीय वृद्धा यांचा समावेश आहे. मिरज येथे सुंदरनगरमधील डॉक्टरसह अन्य दोन रुग्ण आढळून आले आहेत.
|